लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रोन टेहळणी करीत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. सोरतापवाडी व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील आलेल्या तीन चोऱ्या या ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांना आहे. अशातच आता थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवराज काकडे यांना रविवारी (ता. 2) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास 5 ड्रोन घरांवर घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थेऊरसह पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
युवराज काकडे यांना थेऊर येथील काकडे मळा व तारमळा भागात 5 ड्रोन फिरताना दिसून आले. तर काही नागरिकांनी ड्रोनचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आहे. तर पाचमधील एक ड्रोन एका झोपलेल्या व्यक्तीच्या ५ शरीराच्या जवळून गेले आहे. या परिसरातही मागील दोन दिवसांपासून अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत आहे. त्यामुळे रात्री या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी थेऊर, टिळेकरवाडी, भवारापूर, खामगाव टेक परिसरात रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे. तर काही नागरिकांनी फिरत असलेल्या ड्रोनचे व्हिडीओ चित्रीकरणच केले आहे. लाल, हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये आहेत. काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाला. मात्र, नेमके हे ड्रोन कोणाचे आहे? कशासाठी ते उडविले जात आहेत, याची ना पोलिसांना माहिती आहे, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले आहे.