आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महावितरण प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बारामती विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२९) इंदापूरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

गुरुवारी (दि.२५) जून रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली होती. शेतकऱ्यांना नियमानुसार आठ तास वीजपुरवठा मिळत नसल्याची बाब, रात्री वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.
यानंतर मुख्य अभियंता सी. पेटकर यांनी बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता सोलंकर यांना इंदापूरला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित भागांना भेट देत शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज मंडळाच्या स्तरावरील तांत्रिक त्रुटी व अन्य अडचणी पुढील दोन दिवसांत दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी उपअभियंता गावडे, कार्यकारी अभियंता सोलंकर, महेश पाटील, अमोल भिसे, छायाताई पडसळकर, अमोल मुळे, इनायतअली काझी, किशन जावळे, कृष्णा ताटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, अक्षय कोकाटे, अण्णासाहेब काळे, शाहाजी पाटील, विजय कोकाटे, देविदास भोंगे, मधुर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







