पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सोमवारी (ता.२९) सभा होणार आहे. मोदींच्या पुण्यातील सभेबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत तुतारी वाजवून करु.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेवरून प्रसार माध्यमांनी आज रविवारी (ता.२८) सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘अतिथी देवो भव! जेवढे पाहुणे येतील, त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तुतारी वाजवून आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करू, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, पूनम महाजन यांनी अनेक वर्षे चांगलं काम केलं आहे. त्यांचे वडील प्रमोद महाजन हे केवळ भाजपाच नाही तर देशाच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्त्व होते. स्वत: पूनम महाजन यांनी भाजयुमोच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं हे माझ्यासाठी आश्चर्यंकारक आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५+ जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपाने समोर ठेवलं आहे. तसेच शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये विजय मिळवण्यासाठीही भाजपा आणि महायुतीने मोर्चेबांधणी केली असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. या सभेमधून पंतप्रधान मोदी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत.