दौंड, (पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हातवळण गावाला भेट देऊन तेथील स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत लवकरात लवकर तुमच्या अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
यावेळी बोलताना त्या म्हणल्या, मी शेतकऱ्यांची मुलगी आणि शेतकऱ्यांचीच बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा विश्वास महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही निवडणूक कौटुंबिक नाही. ही देशाची निवडणूक आहे. उज्ज्वल भारतासाठी आपण एकत्र आलो आहोत. मी शेतकऱ्यांची मुलगी आणि बायको आहे. मला शेतीचे प्रश्न जवळून माहिती आहे. विकास करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे आहे. मला पाठींबा द्यावा अशी विनंती करते. येणाऱ्या काळातील जबाबदारी पार पाडेल अशी खात्री देते.
महायुतीने मोठ्या विश्वासाने बारामतीची उमेदवारी दिली आहे. बारामतीचा झालेला विकास आपण पाहिला आहे. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. बारामती सोबतच देशासाठी आपण मतदान करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मताची गरज आहे. तुम्ही विकासाला मतदान कराल ही खात्री आहे, आणि तुमचा विकास मी नक्की करेन, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी दौंडकरांना दिला.