दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथे एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनर्वसित दोन एकर जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणांमध्ये पूर्वी दस्त करूनही फसवणूक झाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी संबंधीत व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी लिहिली असून या घटनेन दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखन हरिभाऊ कोऱ्हाळे (वय ३२,रा. हिंगणीबेर्डी, ज्योतीबानगर, ता. दौंड, जि.पुणे) असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना १२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, लखन कोऱ्हाळे या तरुणाने आत्महत्येपूर्वी आपण जीवन संपवत असल्याचे कागदावर लिहून त्याचा फोटो गावातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींची नावे लिहिले होते. हिंगणीबेर्डी पुनर्वसित गट नंबर असा फक्त उल्लेख करत गावातीलच जमीन खरेदी व विक्री करणारे, त्याचबरोबर व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या अशा १५ व्यक्तींसह केडगाव परिसरातील जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटाच्या नावाच्या उल्लेखासह रजिस्टर मॅनेज केल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान, कोऱ्हाळे याने व्हॉट्सअॅपवर आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी शेअर केल्यानंतर मित्र, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लखन याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. दौंड पोलीस अधिक तपास करत आहेत.