नीरा(पुणे) : येथील विवाहिता निकीता घुले (वय २७) हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना घडल्याचे समजताच रविवारी दुपारी तत्काळ तिला लोणंदमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर संतप्त युवकांनी नीरेच्या भर बाजारपेठेतील घुले यांच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याची भूमिका घेतली. परिसरातील जेष्ठांनी युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
परंतु युवकांनी घुले यांच्या राहत्या घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात निकिता यांचा अंत्यविधी केला. रात्री साडेदहाच्या सुमारास नीरेच्या भर बाजारपेठेत ही घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण होते. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर बबन सावंत (वय ५०, रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार, नीरा येथील फिर्यादीची सख्खी पुतणी निकिता चैतन्य घुले (वय २७, रा. नीरा, वार्ड क्र. २) ही लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्याचा फोन दुपारी सावंत यांना आदित्य घुले यांनी केला. त्यांना घटनेचे गांभीर्य सांगून लोणंद येथे बोलावले. दरम्यान, रुग्णालयात पोहोचल्यानंतर आदित्य घुले व आबा घुले यांना निकिताच्या प्रकृतीबद्दल विचारले असता, तुमच्या पुतणीने घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली.
निकिता घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर वाघळवाडीच्या सावंत कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रीया उमटली. युवकांनी घुले यांच्या घरासमोरच अंत्यविधीची भूमिका घेतली. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने घुले कुटुंबातील युवकांना जेजुरी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते.