उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याच कारमधील दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात बुधवारी (ता. 14) सकाळी 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास हारणा कॉम्प्लेक्सच्या समोर घडला.

कारचालक प्रमोद प्रकाश महंत (वय 30, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर मंगल शरद धार (वय-42, रा. शिंदवणे, ता. हवेली), व सुरेखा नंदकुमार कांबळे (वय -41, रा. शिवकृपा मार्केट शेजारी, उरुळी कांचन, असे अपघातात जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. यातील मंगल धार यांच्या डोक्याला व डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबत सुरेखा कांबळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा कांबळे आणि त्यांच्या मैत्रीण मंगल धारक या दोघी भांडगाव (ता. दौंड) येथील सुहाणा मसाला कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे त्या कामावर जाण्यासाठी सकाळी साडेसहाच्या सुमारास तळवडी चौक, उरुळी कांचन येथून जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमध्ये (MH 12 YB 3789) बसल्या.

कार सुरू झाल्यानंतर चालकाने काही अंतरावर गाडी थांबवून रस्त्याला मेडिकल आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर गाडी पुढे निघाल्यानंतर अचानक चालकाने आपले डोके स्टिअरिंगवर टेकवले. चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि सुसाट असलेली कार हायवेच्या डाव्या बाजूच्या लोखंडी पोलला धडकून पलटी झाली व पुन्हा सरळ झाली.
या अपघातानंतर परिसरातील कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबडे आणि माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही जखमी महिलांना व कारचालक प्रमोद महंत या तिघांनाही उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच कारचालक प्रमोद महंत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, या अपघातात सुरेखा कांबळे यांना किरकोळ दुखापत झाली, तर त्यांची मैत्रीण मंगल धारक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना 17 टाके पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत चालक प्रमोद महंत याच्या ताब्यातील अर्टिगा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मयत चालकाविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.







