तुळजापूर : तुळजापूरच्या प्रसिद्ध श्री तुळजाभवानी मंदिरात पुन्हा एकदा व्हीआयपी संस्कृती आणि नियमबाह्य प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वसामान्य भाविकांना साध्या दर्शनासाठी मोठी कसरत करावी लागते आणि तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे सोलापूरच्या एका कुख्यात मटका माफियाला थेट मंदिराच्या अतिसुरक्षित गाभाऱ्यात बेकायदेशीर प्रवेश दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे तुळजापुरात तीव्र संताप उसळला आहे.

मंदिरात असणाऱ्या कडक नियमांनुसार, देशाचे राष्ट्रपती, मंत्री किंवा व्हीआयपी व्यक्तींनाही गाभाऱ्यात प्रवेश मिळणे कठीण असते. सामान्य भाविकांना तर देवीचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. नियम मोडणाऱ्यांवर देऊळ कवायत कलम 24 आणि 25 अन्वये कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी देणारी नोटीस मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी बजावली आहे. मात्र, याच नियमांना धाब्यावर बसवून मटका किंगने चक्क गाभाऱ्यात जाऊन स्वतःचे फोटोसेशन करून घेतले, ज्यामुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण गैरप्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे, या कुख्यात मटका माफियाच्या दिमतीला स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पीए (वैयक्तिक सहायक) उपस्थित असल्याचे समोर आले आहे. राजकारण्यांच्या आश्रयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मंदिरात अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या प्रकारावर भोपे पुजारी मंडळींनी तीव्र आक्षेप घेतला असून, मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आता केली जात आहे.








