लोणावळा : पुण्याहून पनवेलला जात असताना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या खिंडीत एक दुचाकीस्वार दरीत कोसळला असल्याची माहिती स्वतः या मुलाने वडिलांना फोन करून दिली. त्यानंतर वडिलांनी लोणावळा पोलिसांना याबाबत माहिती कळवली.
अक्षय अशोक महाजन (वय २९ वर्ष, रा. सुकापूर, नवीन पनवेल) असे या तरुणाचे नाव असून देवदूत टीम, शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम, फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अग्निशमन दल टीम, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली शहर पोलिस, लोणावळा शहर पोलिस, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, पोलीस व अनेक रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय महाजन हा पुण्याहून पनवेलच्या दिशेने दुचाकीवरून चालला होता. जुन्या महामार्गावरून असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस अंधार होता. त्यामुळे तो खोल दरीत दुचाकीसह कोसळला.
याबाबत त्याने स्वतः वडिलांना फोन वरून माहिती दिली. वडिलांना क्षणाचाही विलंब ना करता शोध सुरू केला आणि लोणावळा पोलिसांना सांगितले. लोणावळा शहर पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलत त्याचा शोध सुरु केला.
अक्षय दरीत कोसळला, पण नेमके कुठे हे ठाऊक नव्हते, तेव्हा शोध चालू असतानाच त्याची दुचाकी शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील दरीत घसरल्याचे समजले. पोलिसांनी रेस्क्यू टीमला पाचरण केले.
दरम्यान, टीम घटनास्थळी पोहचल्यानंतर ५० फुटांवर दुचाकी दिसून आली. मात्र, अक्षय त्याहून खोल २५० फूट दरीत असल्याचे दिसले. लोणावळा येथील रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नानंतर अक्षयला वर काढले. त्यानंतर दुचाकी वर खेचत आणली.