राहुलकुमार अवचट
यवत : पाटस येथील श्री नागनाथ देवस्थान व श्रीराम देवस्थान वहिवाटदार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार व आमदार राहुल कुल यांना निवेदन देण्यात आले.
पाटस परिसरात श्री नागनाथ देवस्थानची सुमारे १४०० एकर इनाम जमीन आहे. त्यातील बहुतांश जमीन ही अत्यल्प मोबदला देऊन पानशेत पुनवर्सनासाठी राज्य सरकारकडून संपादित करण्यात आली होती. तर शिल्लक राहिलेल्या जमिनीसाठी ही वहिवाटदार शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा कोणताही निधी न मिळणे, वारसनोंदी, पीक कर्ज, पाईपलाईन कर्ज, कोणतीही बँक सदर सातबाऱ्यावर कर्जपुरवठा न करणे अशा एक न अनेक प्रश्नासाठी देवस्थान जमीन वहिवाटदार शेतकऱ्यांना वणवण करावी लागते आहे.
देवस्थान इनाम जमीन वहिवाटदार शेतकरी हयात नाहीत तर त्यांच्या वारसांच्या नोंदी गेले तीन वर्षांपासून शासनाने बंद केल्या आहेत. नोंदीसाठी व इतर कायदेशीर बाबीसाठी ऑनलाईन सिस्टीमवर ब्लॉक घालण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीचे ६ हजार व राज्य सरकारने अदा केलेले वार्षिक ६ हजार या निधीपासून सदर शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे.
पिढ्यानपिढ्या देवस्थानच्या सर्व नित्यसेवा व जमीन वहिवाट करून देखील आजही इतर हक्कात शेतकऱ्यांची नावे आहेत. सदर वहिवाटदारांची नावे कबजेदार सदरी घ्यावीत, अशीही निवेदनात मागणी केली आहे. राज्य शासनाकडून सदर शेतकऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे, असे वहिवाटदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या प्रश्नांविषयी शासन दरबारी संबंधित शेतकऱ्यांची बाजू मांडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी शेतकऱ्यांना असून, याबाबतचे निवेदन दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांना दिले. यावेळी हर्षद बंदीष्टी, ताराचंद सुतार, योगेश बंदीष्टी, शांताराम क्षीरसागर तसेच इतर देवस्थान जमीन वहिवाटदार शेतकरी उपस्थित होते.