उरुळी कांचन, (पुणे) : वाडेबोल्हाई येथील अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी (ता. २१) छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकास अटक करून तब्बल २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क हवेली तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, वाडेबोल्हाई परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अचानक छापा टाकला. यावेळी गावठी दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांना २१०० लिटर रसायन, ६४० लिटर गावठी दारू, एक दुचाकी गाडी व इतर अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तर एका इसमास अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त धोमकर, अधीक्षक राजपूत, उपअधीक्षक शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक ए. ए. औटे, सहा. दुय्यम निरीक्षक मोडक, जवान संतोष गायकवाड व दत्तात्रय आबनावे यांच्या पथकाने केली आहे.