बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा आहे. हा पवारांचा गड आहे. काल रात्री कोण घराघरात फिरत होतं आणि काल कोण रात्रभर फिरत होतं, गड किती अभेद्य आहे, हे शरद पवारांना माहित आहे. तर काहीजण गडाला भेगा पडल्यात का म्हणून रात्रभर फिरत होते, असा टोला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
मी काल सामान्य मतदारांसारखा रात्री झोपलो. बारामतीमध्ये काल बऱ्याच गोष्टी घडल्या, माझ्या कानावरही आल्या. पण, यामुळे काही फरक पडलेला नाही. कितीही रात्रभर फिरले तरी काही फरक पडणार नाही. बारामती काय आहे हे चार जूनलाच कळेल. मिशीच्या टीकेवरुन बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, तो शब्दाचा पक्का आहे. तो शब्द राखेल अशी मी आशा करतो, असा टोला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
पुढे बोलताना म्हणाले, हे राजकारण आहे, आज संध्याकाळी संपलं. आम्ही एकाच आईची दोन मुल आहेत. ते राजकारणात आहेत, मी नाही. त्यांच चांगल वक्तृत्व आहे ते स्टेज गाजवतात, मी कधीही स्टेजवर बोलत नाही. आज शेवटच्या दिवशी अति झालं म्हणून मी बोललो. मी राजकारणात कधीही येणार नाही, असंही श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले.
अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये : अजित पवार
बारामती लोकसभा मतदार संघात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारसभा संपल्या आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार तीकाकेली होती. श्रीनिवास पवार म्हणाले होते की, चार जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील. या टीकेवर आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा, असं अजित पवार म्हणाले होते.