लोणी काळभोर, (पुणे) : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आज शनिवारी (ता.९) लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या मतदान केंद्रावर सुरु आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उरुळी कांचन येथील मतदान केंद्र क्र. १ व २ हे डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूल आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्र क्र. ३,४ व ५ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१,२ व ३ आहे. तर केसनंद येथील केंद्र क्र.६ व ७ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे मतदान केंद्रे आहेत.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ६० वर्षापुढील नागरिकांचा मोठा सहभाग नोंदविला आहे. उन्हाचा चटका लागण्यापूर्वीच नागरिकांनी मतदान करण्यास पसंती दिली आहे.
लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार रामदास मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, “यशवंत”ची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी सत्तेच्या रणांगणात उतरलेल्या अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन्ही पॅनेलप्रमुखांनी हायटेक प्रचार यंत्रणेबरोबर साम, दाम व दंड ही आयुधे वापरली आहेत. प्रचार यंत्रणा जोरदार राबवली असली तरी, उद्या दिवसभरात मतदार राजाला कोणता पॅनेल मतदान बुथपर्यतं आणत आपल्याच पॅनेलसाठी मतदान करुन घेतो, यावरच विजयाची गणिते ठरणार आहेत. तसेच ६० वर्षांवरील १३६८३ (६५ टक्के) मतदार आहेत. म्हणजे ६० वर्षांवरील मतदारांचा कल ज्या पॅनेलकडे झुकणार आहे, तो पॅनेल सहजपणे निवडून येणार आहे. तर दोन्ही पॅनेलचे भवितव्य आज शनिवारी (ता.९) मतदानाच्या बंधपेटीत असणार आहे.