पुणे : शिरूर पोलिसांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. निमोणे मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील पोलीस चौकीतील एका पोलिस अधिकाऱ्याने हरियाणा येथील अपघातग्रस्त गाडी मालकाकडून दहा हजारांची मागणी करत पाच हजारांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते उमेश रणदिवे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता शिरुर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली असून पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे दिसत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मांडवगण पोलिस चौकीच्या हद्दीत एक हरियाणा येथील एका व्यक्तीची चारचाकी गाडी (DL 10 CK 7511) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सात ते आठ फूट खड्यात गेली होती. सध्या पाऊस चालु असल्याने गाडी खड्यातुन बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने दोरी बांधुन गाडी बाहेर काढली. पाऊसामुळे चिखलात त्यांचे हातपाय व कपडे खराब झाले. परंतु तरीही परप्रांतीय व्यक्तीला मदत करत तरुणांनी माणुसकी दाखवत चारचाकी गाडी बाहेर काढली.
सदर व्यक्ती मदत करणाऱ्या काही तरुणांना जेवणासाठी पैसे देत होता. पण तरुणांनी ते नम्रपणे नाकारले. पण एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र चारचाकी गाडीची चावी काढुन घेत ‘त्या’ व्यक्तीकडे दहा हजारांची मागणी केली. तसेच तडजोडी अंती पाच हजार रुपये घेतले. यामुळे व्यथित झालेल्या एका उमेश रणदिवे नावाच्या तरुणाने व्हिडीओ बनवुन सोशल मीडियावर टाकत सदर प्रकरण समोर आणले आहे.
एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे संपुर्ण पोलीस प्रशासनाची बदनामी होत आहे. सदर प्रकार हा महाराष्ट्र पोलिसांच्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्याला काळीमा फासणारा आहे. संबंधित अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचे पैसे परत करावेत अन्यथा मांडवगण फराटा येथील चौकात शर्ट अंथरुन भीक मागुन सदरच्या अधिकाऱ्याला पैसे कमी पडत असतील तर देणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले आहे.