युनूस तांबोळी
पुणे : आकर्षक मांडणी, रंगांनी सजलेले शुभेच्छा पत्र हे शब्दाऐवजी रंग, चित्रे आणि चिन्हाच्या माध्यमातून भावना पोहचविण्याचे साधन होते. वाढदिवस, उत्सव, सण याप्रसंगी आपल्या आवडत्या व्यक्तीला ग्रीटिंग कार्ड भेट दिले जात असे. यामध्ये काही प्रेमवीर तर बाजारपेठेत येणाऱ्या कार्डसाठी उत्सुक असायचे पण जमाना बदलला आणि सोशल मीडियामुळे असे ग्रीटिंग कार्ड भेट देण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. बहुतेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली आहेत.
एक काळ असा होता की, वाढदिवस, उत्सव, आणी सणाला ग्रीटिंग कार्ड भेट देण्याची एकप्रकारे प्रथाच होती. वर्षानुवर्षे ही ग्रीटिंग कार्ड सांभाळून ठेवून आपल्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला जात असे. आवडत्या व्यक्तींसाठी महागडे ग्रीटिंग कार्ड घेण्यासाठी दुकानांमध्ये तरुणाईची झुंबड उडत असे. पण सोशल मीडियाचा प्रभाव आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रीटिंग कार्डचे महत्व खूप कमी झाले आहे. दिवाळीच्या वेळी येणाऱ्या शुभेच्छा संदेश आता स्मार्टफोनवर येत आहेत.
मागील काळाचा अभ्यास केला तर मोबाईलच्या शोधानंतरही ग्रीटिंग कार्ड भेट देण्याची पद्धत होती. दिवाळीच्या सणाला तर हमखास शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक व सुशोभित कार्डचा वापर केला जात असे. प्रियकरांसाठी ही अनोखी पर्वणी असायची. बाजारपेठेत मोठ्या आकर्षक ग्रीटिंग कार्ड विकण्यासाठी येत होते. काही तरूणाई तर घरीच असे कार्ड बनवून आपल्या प्रिय व्यक्तीला आकर्षित करत होते.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी देखील घरीच शुभेच्छापत्र तयार करायचे. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिभा फुलायची. कलात्मक ग्रीटिंग कार्ड तयार करण्याची शर्यत लागलेली असायची. सणासुदीच्या काळात शुभेच्छा पत्रांची दुकाने गजबजलेली दिसायची. मात्र, सोशल मीडियाने ग्रीटिंग कार्ड बाजारातून जवळपास हद्दपार केल्याचे चित्र आहे.
प्रिंटींग व्यवसायालाही घरघर…
लग्न व इतर कार्डच्या छपाईत आमूलाग्र बदल झाला. सोशल मीडियामुळे छपाई व्यवसायाला घरघर लागली आहे. काही वेळात मिळणाऱ्या संदेशाने जागा घेतल्याने प्रिंटींग व्यवसाय बंद पडले. मोठी गुंतवणूक असल्याने तरीही व्यवसायात बदल झाल्याने हा व्यवसाय बंद पडला. त्यातून शेकडो कामगार बेरोजगार झाले. अनेक व्यवसायिक कर्जबाजारी झाले. या बदलाबाबत काहींनी जागरूक होऊन दुसरा व्यवसाय स्वीकारला.
अनेक दुकानदारांनी दुकाने केली बंद
वर्षभर सुरू असणारे सण, उत्सव यासाठी ग्रीटिंग कार्ड भेट देण्यासाठी मागणी होत असे. त्यामुळे व्यापारी देखील ठोक भावात खरेदी करून त्याची मांडणी करून विक्री करत असे. पण सोशल मीडियाच्या प्रभावाने ग्रीटिंग कार्डचा ट्रेंड कमी झाला आहे. अनेकांनी ही दुकाने बंद केली असून, व्यवसायात बदल केला आहे. हजारो रूपयांची विक्री होणारा हा व्यवसाय पण ग्राहकच नसल्याने व याला कोणी विचारत नसल्याने दुकाने बंद झाली आहेत.
– विक्रेता, ग्रीटिंग कार्ड