पुणे: पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जायचं म्हटलं की, बराच वेळ जातो. मात्र, पुणे पोलिसांनी आता ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तक्रारदारांचा आणि पोलिसांचा वेळ वाचणार असून, एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया आता सुसाट होणार आहे.

पारंपरिक पद्धतीने एफआयआर नोंदवण्यासाठी सध्या 3 ते 4 तास लागतात. पोलिसांना तक्रारीचा सविस्तर मजकूर हाताने किंवा टाईप करून नोंदवावा लागतो, त्यात योग्य कायदेशीर कलमे शोधावी लागतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि थकवणारी असते. पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (DCP) चिलूमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आता ‘व्हॉइस टू टेक्स्ट’ (आवाजाचे रूपांतर मजकुरात करणे) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

नवीन प्रणालीमध्ये, पोलीस केवळ बोलून तक्रार नोंदवू शकतील. एआय तंत्रज्ञान केवळ तो मजकूर टाईपच करणार नाही, तर गुन्ह्याचे स्वरूप ओळखून त्याखाली कोणती कायदेशीर कलमे लावणे आवश्यक आहे, हे देखील सुचवेल. यामुळे पोलिसांना फक्त मसुदा तपासावा लागेल आणि एफआयआर अंतिम करता येईल.
तक्रारदाराला पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागणार नाही. जलद कामामुळे पोलिसांवरील ताणही कमी होईल. हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्त्वावर असून, तंत्रज्ञानामुळे एफआयआर नोंदवणे सोपे झाले असले तरी, तक्रारीतील तथ्यांची पडताळणी पोलीस अधिकारी स्वतःच करतील. त्यामुळे प्रणाली जरी एआय असली, तरी अंतिम तपास पोलिस करणार आहेत.







