पुणे, ता. 31 : ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्यावर कर्तव्य बजावताना होणारे हल्ले, धमकी, दबाव आणि मानसिक त्रासाच्या घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. 1 सप्टेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच दिवशी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा शांततामय मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल घोळवे आणि सरचिटणीस संदीप ठवाळ यांनी केले आहे.

ग्रामसभा सुरू असतानाच हल्ला; अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीत 17ऑगस्ट रोजी ग्रामसभा सुरू असताना जमावाकडून ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर झालेल्या मानसिक त्रासामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी 18 ऑगस्टपासून ग्रामसभा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आता आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 1 सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- ग्रामसभांची संख्या कमी करून प्रशासकीय ताण कमी करावा.
- ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठोस प्रशासकीय व कायदेशीर संरक्षण द्यावे.
- खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
- पूर्वपरवानगीशिवाय शासकीय कार्यालयातील व्हिडिओ चित्रणास प्रतिबंध करावा.
- धमकी, दबाव, गैरवर्तन आणि बदनामीपासून अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे.
- लाभार्थी निवड गावपातळीवर न करता जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून करावी.
“ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निर्भय वातावरणात काम करता यावे आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा, यासाठी हा लढा आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मूक मोर्चात सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष अमोल घोळवे व सरचिटणीस संदीप ठवाळ यांनी केले आहे.







