बारामती : बारामतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्याच्या हडपसर परिसरात एका खोलीवर नेत दारू पाजून त्या दोघी मुलींवर चौघांनी अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीमधील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिसात १४ सप्टेंबरला दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही मुली या वेगवेगळ्या शाळांमधल्या असून त्या दोन्ही मैत्रिणी आहेत.
त्या १४ सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता त्या बसने पुण्याला पोहोचल्या. दरम्यान, त्यांनी जाताना ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुली पाठोपाठ ज्ञानेश्वर बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेत रात्री त्यांना दारु पाजून चौघांनी त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केला .
दरम्यान, यातील एका मुलीने हडपसरहून आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली असता तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिसासह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. १६ तारखेला मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना दारु पाजून चौघांनी अत्याचार केल्याची माहिती मुलींनी दिली. त्यानुसार बारामती पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, यश उर्फ सोन्या आटोळे यांना ताब्यात घेतले असून त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर चौथा आरोपी मात्र अद्याप फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत नाही आहे.