पुणे : शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशातच आता दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीच्या रुममध्ये शिरुन उशीने तिचे तोंड दाबून पोटात हत्यार भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाल्हेकर वाडी परिसरात घडली आहे. ज्योती नवनाथ केसरकर (वय-२९, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी तिच्याबरोबर राहणार्या ३० वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून चिंचवड पोलिसांनी ज्योतीचा प्रियकर साहिल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, ज्योती केसरकर आणि त्यांची एक मैत्रिण दोघीजणी एकत्र राहतात. त्या दोघी हॉटेलमध्ये कामगार आहेत. फिर्यादी आणि ज्योती निपाणी तालुक्यातील मत्तीवडे या गावच्या रहिवाशी आहेत. दोघींचे पती दारु पिऊन मारहाण करीत असल्याने त्या गावातून निघून पुण्यात काम करण्यासाठी आल्या होत्या. ज्योती हिचा त्यांच्या गावाच्या शेजारील यमगरनी येथील साहिल नावाचा प्रियकर आहे. तो अधून मधून तिला पुण्यात भेटायला येत असे. साहिल हा पुण्याला आला. ज्योतिचे साहिल सोबत कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता. ते दोघे जण मागील दीड महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नव्हते.
दरम्यान, ज्योती साहिल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. बुधवारी सकाळी फिर्यादी मैत्रीण आवरुन रुममधून हॉटेल मध्ये कामाला गेली. ज्योती ही उशिरा येणार होती. दुपारी ३ वाजता त्यांची मैत्रिण रुममध्ये गेली. त्यावेळी ज्योती ही गादीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या तोंडावर एक उशी होती. अंगावरील चादर ओढलेली दिसत होती. चादर काढल्यानंतर तिच्या पोटातून रक्त येत असल्याचे दिसले.
हॉटेल मॅनेजरने सीसीटीव्ही तपासून पाहिले असता असे निदर्शनास आले कि १० वाजून ३५ मिनिटांनी साहिल हा प्रियसीच्या रुममध्ये येऊन तो दहा मिनिटांनी निघून गेला. त्यावरुन खात्री झाली की साहिलने राग मनात धरून ज्योतीच्या तोंड उशीने दाबून पोटात हत्यार भोसकून ज्योतीचा खून केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळू करीत आहेत.