इंदापूर : इंदापूर तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मौजे शेटफळगढे येथील एका २८ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शुभम ओमप्रकाश खराडे, (वय 28 वर्षे, रा. शेटफळगढे ता. इंदापुर जि. पुणे) असे असून त्याचा लहान भाऊ ललित ओमप्रकाश खराडे याने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ललित खराडे याचा मोठा भाऊ शुभम खराडे याला त्याच्या शेटफळगढे येथील राहत्या घराच्या मागे लिंबाच्या झाडास सुती दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आढळल्याचे दिसून आले.
त्यांनंतर नातेवाईकांनी मिळून शुभमला खाली घेऊन तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे घेवुन गेले. तेथील उपस्थित डॉक्टरांनी तपासुन शुभमला मयत घोषीत केले. आत्महत्या का केली? याचे कारण मात्र नक्की समजू शकलेले नाही. शुभमने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला. सदर घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कर्चे हे करीत आहेत.