लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरदाव्यघाने चाललेल्या ट्रिपल सीट दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाटसरूला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.5) ग्रामपंचायत हद्दीतील तोरणा हॉटेलच्या समोर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाटसरूचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
राजेंद्र जनार्दन तांदळे (वय -39, रा. लोणी काळभोर तालुका हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तर सौरभ काशिनाथ धुमाळ (वय 16) आदित्य बापू कांबळे (वय 17) ओमकार जनार्दन जोगदंड (वय 18 सर्व राहणार माळी मळा लोणी काळभोर) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील तोरणा हॉटेलच्या समोरून रस्ता ओलांडत होते. तर ओमकार जोगदंड, आदित्य कांबळे व सौरभ धुमाळ हे ट्रिपल सीट दुचाकीवरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चालले होते.
दरम्यान, रस्ता क्रॉस करणाऱ्या तांदळे यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकी डिव्हायडर ला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघे व तांदळे हे रस्त्यावर पडले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तांदळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर ओमकार जोगदंड, आदित्य कांबळे व सौरभ धुमाळ यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.