शिरूर, (पुणे) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष बदलला नाही. तर ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती. अशातच आढळरवांना खासदार करायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर मधला मार्ग म्हणून मी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले की, जागा जरी राष्ट्रवादीकडे गेली, तरी उमेदवार हे शिवाजीराव आढळराव पाटीलच राहतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची पाचखंडी चौक येथे सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, हुशार विकासकामे करणारा, गोरगरिब जनतेसाठी अहोरात्र झटणारा खासदार हवा आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केला. समोरच्या उमेदवारांनी मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी असे अनेक पक्ष बदलले, पाच वर्षात मतदारसंघात फिरकले देखील नाहीत. अमोल कोल्हे हे नाटककार असून त्यांच्यासारखी नाटक आढळराव यांना जमत नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली.
प्रत्येक मतदारांनी लक्षात घेतलर पाहिजे, ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभाची निवडणूक नसून ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाला मजबुत बनवू शकतात, देशाला विश्व गौरव बनवण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी यांच्याकडे जे इंजिन आहे. त्या इंजिनमध्ये राहुल गांधी स्वतः तसेच सोनिया गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बसवणार. या इंजिनमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब, दलित, आदिवासी या लोकांना बसवण्यासाठी जागा नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंजिनमध्ये या सर्व नागरिकांना बसण्यासाठी जागा आहे. म्हणून मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये 25 कोटी गरिबांना घरे दिली, असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार म्हणून काम करत असताना कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्याचे काम केले. मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याच दिवसापासून पुन्हा कामाला लागलो. शिरूर सारख्या शहरांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 72 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून त्याचे कामही सुरु केले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिरूर येथे उभारलेली नगर परिषदेची प्राथमिक शाळेच्या नविन बांधकामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी आणून काम सुरु केले.
आत्ताचे खासदार अमोल कोल्हे यांनी मतदारसंघांमध्ये पाच वर्षात तोंड दाखवले नाही. गावोगावी प्रचाराला गेल्यानंतर तेथील नागरिक त्यांचा सत्कार करून तुम्ही पाच वर्षात काय काम केले, आणि पाच वर्षात किती वेळा आमच्या गावात आले अशी विचारणा करत आहेत. आपलं अपयश लपवण्यासाठी माझ्यावर व माझ्या कंपनीवर बिनबुडाचे आरोप कोल्हे करत आहेत. तसेच मला बदनाम करण्याचे काम करत आहेत असं म्हणत अमोल कोल्हे यांना त्यांचा पराभव दिसत असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.