पुणे : राज्यातील लोकसभेच्या ‘मिशन-४८’साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. शिवसंकल्प अभियानाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रचार मेळावे होणार आहेत. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग देखील फुंकले जाणार आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक गुरुवारी पार पडली. शहर प्रमुख नाना भानगिरे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख निलेश घारे, सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचे प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी पुण्यातील शिरूर येथून सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरूवात होणार आहे.
या दिवशी शिर्डी येथे दुसरा प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. या शिवसंकल्प अभियान पूर्व नियोजित आढावा बैठकीत, राज्यातील लोकसभेच्या 48 जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार शिवसैनिक, तथा सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.