पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती/प्रतिनिधी: शिरुर पोलिस ठाण्याचे कामकाज शिरुर बस स्थानकाशेजारील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीमध्ये उद्या शनिवार, दि.१५ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनी नवीन इमारतीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नवीन इमारतीतून पोलिस ठाण्याचे प्रशासकीय व पोलिस कामकाज सुरू राहणार आहे.या पोलिस ठाण्याच्या इमारतीची उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी आज पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली. नवीन इमारत बस स्थानकाशेजारी असल्यामुळे नागरिकांना पोलिस ठाण्याशी संपर्क साधणे तसेच विविध शासकीय व पोलिस सेवा घेणे अधिक सुलभ होणार आहे.

या इमारतीमध्ये पोलिस ठाण्याचे दैनंदिन कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, गुन्हे तपास, नागरिकांच्या तक्रारी व अर्ज, बंदोबस्त नियोजन तसेच इतर सर्व पोलीसविषयक कामकाज नियमितपणे सुरू राहील.नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज, तक्रारी,हरविलेल्या वस्तू/कागदपत्रांबाबत अर्ज, विविध पोलीस परवानगीसंबंधी अर्ज तसेच इतर नागरिकांच्या समस्या स्वीकारून त्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार कायद्यानुसार आवश्यक असल्यास गुन्ह्यांची नोंद करण्यात येईल. दाखल गुन्ह्यांची कागदपत्रे, नोंदी व पुढील कायदेशीर कार्यवाही या विभागामार्फत करण्यात येईल.दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध, पुरावे संकलन, पंचनामे, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे यांचा वापर करून गुन्ह्यांचा तपास करण्यात येईल.
शिरूर शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पेट्रोलिंग, बंदोबस्त, संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवणे, मिरवणुका, सभा, आंदोलने व विविध सार्वजनिक कार्यक्रमांबाबत आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येईल. शिरूर शहरातील वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे, नो-पार्किंग क्षेत्र, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्या तसेच पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येईल.
शिरूर शहर व ग्रामीण भागातील चोरी, घरफोडी, वाहन चोरी, चेन स्नॅचिंग तसेच इतर मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित पेट्रोलिंग, संशयित व्यक्ती व वाहनांची तपासणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात पोलिस ठाण्याची नवीन इमारत अधिक प्रशस्त व सुविधायुक्त असल्यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येणार असून, नागरिकांना पोलिस सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
“नागरिकांचा विश्वास, सुरक्षित शिरूर आणि प्रभावी पोलिस सेवा” या उद्देशाने या इमारतीमधून कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पद्धतीने करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.







