Shirur News : महिला ही देखील नवदुर्गेचे रूप असते. काही महिलांना कुटूंबा बरोबर वेगवेगळ्या मिळालेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हसतमुख चेहरा, अन मनमिळाऊ स्वभाव त्यातून गावच्या सुरक्षीततेसाठी पुढाकार घेण्याची वृत्ती. संघटन, कार्यकुशलता व निर्भीड असणारी टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील पहिली महिला पोलिस पाटिल शोभा मंदिलकर गावची सुरक्षितता, प्रगतीसाठी झटणारी अशी ‘नवदुर्गा’ आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर असणारे निर्भीड व्यक्तिमत्व
सर्वसाधारण कुटूंबात सुखी संसाराची स्वप्न गिरवत प्रंचच चालवणारी शोभा मंदिलकर ही एक गृहिणी, उत्तम प्रशासक, उद्योजक असा पल्ला गाठणारी महिला आहे. कुटूंबातील सुख दुःखांना सामोरे जाण्यात ती धन्यता मानायची. वेळ प्रसंगी कुटूंबावर आलेले संकट दुर करण्याची ताकद तिच्यात होती. त्यामुळे कापड व्यवसाय व विटभट्टी सारखा व्यवसाय देखील तिने हसत हसत केला. त्यातून मुलांना शिक्षण देण्याचे काम तिने केले आहे.
शोभा मंदिलकर यांच्या प्रगतीच्या वाटेत अनेक दुखाचे काटे आहेत. पण त्या नेहमी काटेरी जीवनाला कवटाळून बसल्या नाहीत. कष्ट करतच मुलांना प्रगतीच्या वाटेवर आणून ठेवले आहे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या नेहमी समाजात वावरताना दिसायच्या. टाकळी हाजी गावच्या पोलिस पाटील पदाची भरती निघाली. त्यांनी परिक्षा देऊन त्या उत्तीर्ण देखील झाल्या. मागील १३ वर्षापासून शिरूर तालुक्यात नावाजलेल्या टाकळी हाजी गावच्या त्या पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत. महिला म्हटल की पदापेक्षा जबाबदारी टिकवण्याला महत्व असते. त्यातून गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेले पोलिस पाटिल पद तेवढेच महत्वाचे आहे. पण पोलिसांच्या मदतीने त्या आजही सुरक्षीतता व शांतता कायद्याच्या चाकोरीत राहून आपले कर्तव्य पार पाडतात.
कोरोना काळात पोलिस पाटिल म्हणून जबाबदारी महत्वाची होती. पण या काळात देखील गरजू लोकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. टाकळी हाजी मोठ्या लोकवस्तीचे गाव असले तरी देखील त्यांचे काम परिपुर्ण असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडील शासकीय जबाबदारी त्या पोलिस विभागामार्फत पार पाडत असतात. स्वच्छता, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासारख्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. गावच्या विकासाच्या कामाच्या चर्चेत ते नेहमी सहभागी असतात. मुलगी गौरी डी एड तर मुलगा मयुरचे एमबीए पर्यतचे शिक्षण झाले आहे. विटभट्टीचा कारखाना तो यशस्वीपणे चालवतो.
दरम्यान, टाकळी हाजी गावाला महात्मा गांधी गाव तंटामुक्त अभियानाच्या माध्यमातून आठ लाख रुपये बक्षीस त्यांच्या काळात प्राप्त झाले आहे. गावातील बांधावरील भांडणे, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, घरगुती कलह मिटविण्यात त्यांचा पुढाकार असतो.
कर्तबगार महिला असली तर तीच्या कुटूंबाला देखील दिशा मिळते. महिलांनी यासाठी स्पष्ट असणे गरजेचे आहे. अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा तितकाच दोषी असतो. शांततेच्या मार्गाने नेहमी प्रश्न सुटतात. त्यासाठी महिलांनी एकत्रीत समन्वय ठेवला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे . स्वतःही व्यवसायात उत्तुंग भरारी घेताना कापड व्यवसाय, किराणा, कुटुंबाचा परंपरागत वीटभट्टीचा व्यवसाय त्यांनी सक्षमपणे उभा केला आहे. संघर्षशील, निर्भीड व्यक्तिमत्व, उत्तम संघटन, प्रशासनाची परिपूर्ण जाण त्यांना आहे. सगळ्या जीवन प्रवासात सासू, सासरे आणि कुटुंबाची खूप मोठी साथ लाभल्याचे शोभा मंदिलकर आवर्जून सांगतात.