राजू देवडे
लोणी धामणी : जारकवाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत कौसल्या संतोष भोजने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यानंतर सर्व सदस्यांनी एक मताने उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य सचिन बापू टाव्हरे यांची एकमताने निवड करत आहोत, अशा आशयाचा ठराव तालुका दंडाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. उपसरपंचपदी निवड झालेली असताना पुन्हा ठराव संमत केल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये कौसल्या संतोष भोजणे यांची उपसरपंचपदी निवड ही नियमाप्रमाणे झाली आहे. पण, त्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी एक स्वतंत्र ठराव करून सचिन टाव्हरे यांच्या नावालाही मान्यता द्यावी, असा अर्ज तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या नावाने पाठविला आहे. तो अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे, असे निवडणूक सचिव तथा ग्रामसेवक तुकाराम मोरे यांनी स्पष्ट केले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भक्ती-शक्ती पॅनेलचे सरपंचपदासह सर्व दहा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते. एक जागा रिक्त राहिली होती. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सरपंच प्रतीक्षा बढेकर यांच्यासह सदस्य सचिन टाव्हरे, सुरेश एकनाथ मंचरे, सुभाष पिराजी लबडे, श्रावण बबन काकडे, श्याम मल्हारी बढेकर, पुष्पा शिवाजी जारकड, सुवर्णा एकनाथ भांड, अलका कैलास कापडी, रुपाली शिवाजी कजबे उपस्थित होते.