अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील कल्याणी फाटा नजीक असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करीत हॉटेल चालक मालकासह व्यसनी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल अंबादास दांडगे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
प्रद्युग्न सतीश शिंदे (वय २६ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे), कुणाल विलास यादव (वय २६ वर्षे रा. यादववस्ती अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), धनंजय संदीप शेलार (वय २६ वर्षे रा. मेमाणवाडी अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), सागर सुनील कामठे (वय २५ वर्षे रा. धानोरे ता. शिरुर जि. पुणे), प्रणय सुखदेव यादव (वय २७ वर्षे रा. शिंदेवाडी अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), संदीप गणपत शिवले (वय ३७ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे), मुजम्मील अब्दुलकादी अली (वय ४६ वर्षे रा. सावली हॉटेल कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मुराजा ता. ढोबाका जि. हुजाई आसाम) तसेच हॉटेल मालक महेश ढेरंगे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) व केदार सुरेश कोतवाल (रा. अष्टापूर ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील कल्याणी फाटा नजीक असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे वरच्या मजल्यावर बेकायदेशीरपणे मानवी जीवितास धोका असलेली हुक्का पार्टी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, विकास पाटील यांनी हॉटेल सावली येथे जाऊन छापा टाकला असता काही तरुण दोन टेबलवर बसून हुक्का पार्टी करताना मिळून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील हुक्का पाकीटे, फॉईल पेपरचा १ दरोल, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर फिर्यादीवरुन हॉटेल मालकासह तरुणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.