इंदापूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असताना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी शरद पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या उमेदवारी बाबत मोठ विधान केलं आहे.
इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार ठरवू असं विधान पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंद बागेत पत्रकारांशी बोलताना केलं आहे. तसेच त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत तालुक्यात सर्वे करून जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देऊ असंही शरद पवारांनी यावेळी म्हणाले.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक शरद पवारांना गोविंद बागेत भेटले. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या पैकीच कोणालातरी उमेदवारी जाहीर करा. आम्ही सर्वजण प्रचार करू असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. पक्षाबाहेरून आलेल्यांना आता उमेदवारी नको असा सूर कार्यकर्त्यांनी लावला. यावेळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार ठरवू असं आश्वासन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं.