बारामती : तुम्ही पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला, ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? असा सवाल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
पुढे बोलताना म्हणाले, ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे, असंही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.
अजित पवारांचा विवाह १९८५ साली झाला. सुनेत्राताई पवारांची सून म्हणून १९८५ ला आल्या. त्या आधी १९७८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. जबाबदारीने बोलतो. तुम्हीही इतिहास तपासा. १९८५ ला सुनेत्राताईंचे पाय बारामतीला लागले त्यानंतरच बारामतीचा विकास सुरू झाला हे विसरता कामा नये, असा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केला.
देशातील प्रत्येक कॅमेऱ्यासमोर बोलतोय. प्रत्येकाला उत्तर देण्याची तयारी ठेवून बोलतो. ते म्हणतात (शरद पवार) दादांनी (अजित पवार) गद्दारी केली. दादा गद्दार आहे. आमच्यासारख्यांनी काही बोललं तर लगेच यांची लायकी आहे का? साहेबांच्या विरोधात बोलावं? होय, साहेब आमचं दैवत आहेत. आजही जाणते राजा आहेत. जाणता राजाला घर नसतं. पोरं नसतात. बाळ नसतं. संबंध कुटुंब त्यांचं घर असतं. रयत त्याचं घर असतं. रयत आणि कुटुंबात निवड करताना कुटुंब निवडायची वेळ का आली? असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला.