संदीप टूले
केडगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडचे माजी नगराध्यक्ष आणि नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. या तिघांची बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. नेमकी चर्चा काय झाली? कटारिया दौंडमध्ये आता काय परिवर्तन करणार? याची चर्चा सध्या दौंड शहरासह तालुक्यात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामती मतदारसंघाचा कानाकोपरा ते पिंजून काढत आहेत.
रविवारी ७ एप्रिलला दौंड शहरात मातंग समाजाच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक असलेले दौंड शहराचे माजी नगराध्यक्ष आणि नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची पवारांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही होत्या.
दरम्यान, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कटारिया यांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. नेमकी चर्चा काय झाली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रेमसुख कटारिया यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे. तर दौंड शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाचे मताचे पारडं जड असते. त्यामुळे शरद पवार यांनी कटारिया यांच्या घेतलेल्या भेटीमुळे दौंडच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळते का? याची चर्चा रंगली आहे.