दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील एका व्यक्तीला मी तिकीट दिले, निवडून आणून आमदार तसेच मंत्री देखील केलं. लोकांच्या विकासासाठी काही काम करतील असं वाटलं होतं. मात्र, त्याने स्वतःचाच विकास केला, अशी टीका शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. माझी त्यावेळी चूक झाली यंदाच्या विधानसभेत दुरुस्त करण्याची संधी आली आहे, असं आवाहन देखील पवारांनी तालुक्यातील नागरिकांना केलं आहे.
इंदापूर तालुक्यात मंगळवारी १६ एप्रिल रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करत शहरातील वाघ पॅलेस या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकररावजी पाटी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्यासह निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव माने, इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रताप पालवे, भाजपाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत येऊन भाषणात सांगितले की, शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. पंतप्रधान माझे बोट धरून राजकारणात येतात यावर कसा विश्वास ठेवायचा. अनेक आश्वासने त्यांनी दिली, परंतु त्याची पूर्तता काही त्यांनी केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. ज्या कुटुंबाने अनेक वर्षे देशाच्या स्वातंत्र्याआधी व देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची सेवा केली, अशा कुटुंबाच्या हातात देशाची सत्ता द्यायची. माणूस, जात, धर्म, भाषांमध्ये दुरावा वाढविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची. मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती वेगळी दिसत आहे.
आता लोकांच्या लक्षात आले आहे की, या देशाची सत्ता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात, मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करण्याचे क्लिनिंग मशिन झालं आहे, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.