बारामती : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. नमो रोजगार मेळाव्याचे निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर असून त्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील आज उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामतीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत.मात्र, या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातीला शरद पवारांना या कार्यक्रमाच्या निमंत्रण नसल्याने वाद झाला होता. त्यानंतर प्रशासनाने सारवासरव करत नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचंनाव नमूद केलं. त्यामुळे आता आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार हे निश्चित झालं आहे
नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. तसेच या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचे पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे.