पुणे : पुण्यात एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मामीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तब्बल २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी ठेवले होते. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, मामी चिमुकलीला सतत मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.