सागर जगदाळे
भिगवण : देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथे सहा वर्षांच्या चिमुकलीवर २३ वर्षांच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला होता. १५ जानेवारी ते १९ जानेवारी असे सलग पाच दिवस चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अहिल्यादेवी चौक-खाटीक गल्ली ते भिगवण पोलीस ठाण्यापर्यंत कडकडीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी याने पीडित मुलीला दुकानातून शॅम्पू आणण्यासाठी घराबाहेर बोलावले. मात्र, त्याला पाहून मुलगी घाबरून रडू लागली आणि तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. मुलीचे असे वागणे संशयास्पद वाटल्याने आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने घडलेली हकिकत आईला सांगितली. पाच दिवसांपासून तो आपल्यासोबत गैरकृत्य करत असल्याचे मुलीने आईला सांगितले. त्याचसोबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही मुलीने सांगितले.
मुलीने घडलेली घटना सांगताच २५ जानेवारी रोजी पीडितेच्या आईने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अत्याचाराच्या या घटनेविरोधात कडकडीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. त्याचबरोबर पीडित कुटुंबास शासकीय मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन भिगवण येथील समस्त हिंदू खाटीक समाजातर्फे भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्याकडे देण्यात आले.