राहुलकुमार अवचट
यवत : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्यावतीने तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाचे चौफुला (ता. दौंड) येथे आयोजन करण्यात आले आहे. या भीमथडी मराठी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी दिग्विजय जेधे, तर निमंत्रकपदी सागर फडके आणि सहनिमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
तिसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन १६ व १७ जून रोजी होणार असून संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, कैलास शेलार, डॉ.भालचंद्र सुपेकर, रवींद्र खोरकर, सुशांत जगताप, बाळासाहेब मुळीक, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, राहुल यादव उपस्थित होते.
भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कलारंग, कविसंमेलन व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष संजय सोनावणे यांनी दिली.
दिग्विजय सर्जेराव जेधे हे देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सिंहगड राजगड तोरणा या सह्याद्रीच्या गडांवर होणारी महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे ते संस्थापक आहेत. तसेच बारामतीचे पहिले खासदार स्वातंत्र्यसैनिक देशभक्त केशवराव जेधे यांचे पणतू आहेत. केशवराव जेधे यांच्या स्वतंत्र्यपूर्व काळातील देशासाठी योगदान त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, सत्यशोधक कार्याचा प्रचार आणि प्रसार या संस्थेच्या मार्फत ते करत आहेत.
स्वराज्यावर अफझलखान चालून आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्वतःच्या वतनावर पाणी सोडणारे स्वराज्य वीर कान्होजीराव जेधे यांचे ते १३ वे वंशज आहेत. गेली १५ वर्ष अविरतपणे शिवकार्य, समाजकार्य ते करत आहेत. आग्रा ते राजगड – गरूडझेप मोहिम-१७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेत राजगडावर सुखरूप आले. त्या घटनेला मानवंदना देण्यासाठी ४ राज्यांतून हातामध्ये शिवज्योत घेऊन आग्रा येथील लाल किल्ल्यापासून राजगडपर्यंत सुमारे २००० युवक १२५३ किलोमीटर १३ दिवसांत धावत आले. ही मोहिम भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी शिवज्योत आहे.
सागर फडके हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) दौंड तालुका युवक अध्यक्ष असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस स्व.नानासाहेब फडके यांचे हे सुपुत्र आहे. सागर फडके हे तालुक्यात तरुणासाठी नेहमी सक्रीय असतात तर मोहन जाधव हे महाराष्ट्र राज्य कैकाडी महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग नेहमी घेत असतात.