पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दोन्ही उमेदवारांना तातडीने खर्चाचे स्पष्टीकरण देण्यासंदर्भांत दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या दैनंदिन प्रचार खर्चावर निवडणूक खर्च विभागाकडून ताळेबंद ठेवले जात आहे. त्यानुसार उमेदवारांच्या प्रचारखर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी पार पडली. त्या तपासणीत आढळराव यांच्या खर्चात २४ लाख २७ हजार ९२१ रुपयांची, तर कोल्हे यांच्या खर्चात १३ लाख ५४ हजार ३ रुपये इतक्या खर्चाची तफावत असल्याने हिशोब जुळत नसल्याचे समोर आले.
त्यानुसार दोन्ही उमेदवारांना ५ मेपर्यंत खर्च सादर करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यातच ७ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली असताना आढळराव यांच्या खर्चात ३० लाख ४६ हजार ७८६ रुपयांची, तर कोल्हे यांच्या खर्चात ११ लाख ७७ हजार ४५८ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही उमेदवारांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.