पुणे : यवत येथे गेले ३ दिवस वैष्णवांचा मेळा दाखल होत असून, या पार्श्वभूमीवर लहान मुलांना देखील पंढरीची वारी माहिती व्हावी या उद्देशाने यवत परिसरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी व हरिनामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत, यवत स्टेशन, किलबिल बालक मंदिर, विद्या विकास महाविद्यालय येथील बाल-गोपाळांनी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत पालखी सोहळा साजरा केला, विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सोहळयाचे आकर्षण ठरले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी यवत येथे मुक्कमी असल्याने गेले ३ दिवस यवत परिसर भक्तीमय झाला होता. यातच आज संत सांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान व शनिवार सकाळची शाळा असल्याने अनेक शाळांमध्ये चिमुकल्यांची पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व चिमुकल्यांनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा, कोणी रुक्मिणी तर कोणी तुकाराम म्हणून आकाशाचे केंद्र ठरले. पारंपारिक पद्धतीने रिंगण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन, हे बघून जणू हे सर्व बालगोपाळ खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी यवत नगरीत अवतरले.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात हरिनामाचा गजर झाला. अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. ‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य व फुगडी खेळत प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण निर्माण केले.
रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात पालकांच्या विठुरायाची आरती करून प्रसादाचे व खाऊचे वाटप करण्यात आले. तर जिल्हा परिषदच्या स्टेशन शाळेत आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेने छोटीसी मदत म्हणून उपसरपंच सुभाष यादव यांच्या वतीने इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास पेटी, पाणी बॉटल याचे वाटप करण्यात आले.आणि यवत परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.