(अजित जगताप)
Satara News बिदाल : माण तालुक्यातील आराध्यदैवत व नवसाला पावणाऱ्या सतोबा देवस्थानला जाण्यासाठी टाकेवाडी ते येळेवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे भाविकांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
वार्षिक यात्रेनिमित्त श्री सतोबा व बिरोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी…!
दसऱ्याच्या दिवशी धनगर समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी वार्षिक यात्रेनिमित्त श्री सतोबा व बिरोबा देवाच्या दर्शनासाठी येतात. नवस बोलल्यानंतर याठिकाणी गोडवे निवैध व नंतर बकरी कापून त्याचा निवैध दैत्य राज यांना दिला जातो. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात प्रसाद तयार करून नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांना सन्मानपूर्वक प्रसादाचे निमंत्रण दिले जाते. याठिकाणी सतोबा मंदिराच्या निसर्गरम्य परिसर असल्याने देवदर्शन व पर्यटन असा दुग्धशर्करा योगायोग जुळून येतो.
छोट्याशा डोंगरावर असलेल्या मंदिराकडे दहिवडी व वडूज येतून जाण्यासाठी सुसज्ज रस्ता नसल्याने भाविक व पर्यटक यांना गैरसोयीला तोंड दयावे लागत आहे. यापूर्वी पांगरी येथील बिरोबा मंदिर ते सतोबा देवस्थान टाकेवाडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बऱ्याच वर्षांपूर्वी झाले होते. वन विभागाच्या हद्दीत काही भाग येत असल्याने विविध प्रकारच्या परवानगी मिळविण्यासाठी तसेच प्रशासकीय व तांत्रिक मुद्यांवर सव्वा किलोमीटर अंतराचा टप्पा डांबरीकरणापासून वंचित राहिला होता. खडीकरण उद्धवस्त होऊन संपूर्ण रस्ता उखडला असल्याने बैलगाडी मधूनही हेलकावे खात जावे लागत होते. अनेक वर्षांपासूनची मागणी असून देखील हे काम करून मिळत नव्हते.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा माण-खटाव मतदारसंघ तालुकाध्यक्ष प्रशांत विरकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. काँग्रेसचे युवा नेते तथा धनगर समाजाचे भाविक राहुल सजगणे, डॉ. संतोष गोडसे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, अशोक घाडगे यांनी या रस्त्याची दुरुस्ती वार्षिक यात्रेपूर्वी करावी. तसेच या सतोबा मंदिरातील पुजारी वर्ग तसेच मंगेश दडस, बापू दडस यांनी ही भाविकांच्या माध्यमातून येळेवाडी, टाकेवाडी ,पिंपराळे असा रस्ता होण्याची मागणी केली होती. त्याला यश मिळाले आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हा रस्ता चांगला होऊन स्थानिक ग्रामस्थ व भाविकांना न्याय मिळाला आहे. त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग व मान्यवरांचे आभार मानण्यात आले आहे.