संदीप टूले
केडगाव, (पुणे) : अनेक घराघरांत गूळ वापरला जातो. गेल्या काही वर्षांपासून गुळाची मागणी वाढत आहे. त्यात गुळाच्या अर्धा-एक किलोच्या ढेपांपासून ते पावडरच्या गुळापर्यंतचा समावेश आहे. तर अलीकडे गुळाच्या चहा देखील फेमस झाला आहे. त्यामुळे सध्या गूळ खरेदीकडे अनेक कुटुंबाचा कल वाढला आहे.
सध्या सेंद्रीय गूळ खरेदीकडे नागरिकांचा जास्त ओढा असून, तो किमतीने जास्त असूनही ग्राहक मात्र तोच गूळ खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तो केमिकल विरहित असल्यामुळे त्याला औषधी गुळ म्हणूनही पाहिले जाते. म्हणून प्रत्येक जण हाच सेंद्रीययुक्त गूळ खरेदी करण्याकडे प्राधान्य देत असतात. मात्र, या सेंद्रिय गुळाच्या नावाखाली अनेक हॉटेल, स्टॉल्सवर तसेच रोडच्या कडेला स्टॉल लावून भेसळयुक्त, रासायनिक गुळाची व काकविची गूळ पावडरची सर्रासपणे विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
भेसळयुक्त व रासायनिक गूळ विकण्यामागील गणित
यामधून प्राथमिक माहिती अशी मिळाली की, एक किलो ओरिजनल सेंद्रिय गुळाचा उत्पादन खर्च हा जवळपास ७० ते ८० रुपयांपर्यंत येतो. तसेच तो गूळ स्टॉलपर्यंत पोहचण्यास ९० रुपये खर्च पडतो म्हणजे विक्रेत्यांचा १० ते २० रुपये नफा लावून ११० पर्यंत ग्राहकाला मिळतो. तर दुसरा भेसळयुक्त व रासायनिक गूळ १ किलोचा हा ३५ ते ४० रुपये हा त्याचा उत्पादन खर्च आहे. सामान्य विक्रेत्याला हा एक किलो गूळ जेमतेम ५० रुपये पर्यंत मिळतो. त्यामुळे हे विक्रेते त्याच गुळाला सेंद्रिय गुळाचे लेबल लाऊन भरमसाठ नफा मिळविण्यासाठी सेंद्रिय गुळाच्या नावाखाली सर्रासपणे रासायनिक गूळ विकत आहे.
रासायनिक गूळ आरोग्यासाठी घातक
रासायनिक गूळ विकणारे रस्त्यावरील वाटसरूंना बिनधास्तपणे फसवत आहे. हा त्यांचा उद्योग खूप दिवसांपासून सुरू असून, भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण हा रासायनिक गूळ आरोग्यासाठी खूप घातक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्यांचा वापर गूळ निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने आपली निद्रावस्था मोडून याकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचे आहे.
स्टॉल्सवाले करताहेत ग्राहकांची फसवणूक
सेंद्रीय लेबलच्या नावाखाली रासायनिक गुळाची विक्री चालू आहे. कारण या दोन्ही गुळामध्ये मिळणाऱ्या नफ्यामध्ये खूप तफावत असून, काही स्टॉलवाले ग्राहकांची फसवणूक करत आहेत. पण त्यामुळे आमच्यासारख्या ओरिजनल सेंद्रिय गूळ विक्रेत्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होत आहे.
– किशोर सोनवणे, गूळ विक्रेता.
ग्राहकांनी गूळ तपासूनच खरेदी करावा
मध्यंतरीपासून जरी सेंद्रीय गुळाचे मागणी जरी वाढली असली तरी विक्रेते मात्र सेंद्रिय गुळाचे नावाखाली रासायनिक गुळांची विक्री करत आहे. यामुळे आम्हा सेंद्रिय गूळनिर्मिती करणाऱ्यावर खूप मोठे संकट ओढवले आहे. कारण, ओरिजनल सेंद्रिय गूळ उत्पादन खर्च हा रासायनिक गुळापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांनी गूळ तपासूनच खरेदी करावा. स्वस्त गुळाच्या मागे लागू नये.
– विकास म्हेत्रे, श्रेया सेंद्रीय गूळ उद्योग