वाडेबोल्हाई : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील सुवर्णकन्या पैलवान साक्षी गुलाब इंगळे हिने वन विभागाच्या परीक्षेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून महिला वनरक्षक बनली आहे. साक्षीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वतीने वनरक्षक पदासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, या परीक्षेत साक्षीने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने प्रशिक्षण पूर्ण केले असून, ती पुढील काही दिवसांत गोखलेनगर येथील वन विभागाच्या कार्यालयात रुजू होणार आहे.
साक्षीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केसनंद (ता. हवेली) ज्ञान अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. साक्षी ही आता श्रीगोंदा (जि. नगर) येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. साक्षीने सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी (महिला) कुस्ती स्पर्धेतील ५३ किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करून कांस्यपदक पटकावले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे नातेवाईक, गावातील कार्यकर्ते यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशासाठी साक्षीला तिचे आई-वडील, काका सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे व महाराजा कॉलेजचे प्रा. संजय डफळसर, तालमीचे समाधान, मेजर हनुमंत फंड यांचे मार्गदर्शन लाभले.
कुस्तीचा कसलाही वारसा नाही तरीही….
कुस्तीचा कसलाही वारसा नसताना साक्षीचे आई-वडील तिच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नेहमी तिला प्रोत्साहन देत आहेत. कुस्ती क्षेत्रातील धडे शिकावेत म्हणून त्यांनी साक्षीला श्रीगोंदा येथील इंटरनॅशनल कुस्ती संकुलात सरावासाठी पाठवले. सध्या साक्षी उत्तमप्रकारे कुस्तीचे धडे घेत आहे.
यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील
‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना साक्षी म्हणाली की, ‘खेडेगावातील असूनही त्यांनी मुलगा आणि मुलीमध्ये कधीच फरक ठेवला नाही. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले. म्हणून माझ्या या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील आहेत. कोणत्याही परीक्षेद्वारे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर नक्की गाठू शकता’.