पुणे: पुणे सातारा रस्त्यावरून एक इसम पोलिसांना पाहून गडबडीत चालला होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच गुन्ह्यातील 5 आरोपींना सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 2070 नकली नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत.
निलेश हिरानंद विरकर (वय 33, रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन), सैफान कैयुम पटेल (वय 26,रा. सेक्टर 12 ई सत्तार पडन बिल्डींग कोपर खैरने नवी मुंबई), अफजल समसुद्दीन शहा (वय 19 ,रा. सेक्टर 12 ई झमझम अपार्टमेंट कोपर खैरने नवी मुंबई), शाहीद जक्की कुरेशी (वय 25, रा. सेक्टर 12 ई झमझम अपार्टमेंट दुसरा मजला घर नं.202 कोपर खैरने नवी मुंबई) व शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी (वय-22, रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट चौथा मजला रुम नं. 411 साडी कंपाऊंड नालासोपारा पुर्व पालघर ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना पुणे सातारा रस्त्यावर आरोपी निलेश विरकर हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या 250 नकली नोटा आढळून आल्या. तसेच निलेश विरकर याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालवीत असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी निलेश विरकर याच्यावर सहकार नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 180 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी आरोपी निलेश विरकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपीने नकली नोटा या शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा व शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी यांच्याकडून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपये दराच्या 2070 नकली नोटा जप्त केल्या आहेत.
ही कामगीरी पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, महेश भगत खंडु शिंदे व योगेश ढोले यांच्या पथकाने केली आहे.