पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही जोरदार प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची बारामती येथे सांगता सभा सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पवारांनी भर सभेत डोळ्यातून पाणी काढून दाखवलं असं म्हणत अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार म्हणाले, आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या. ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम आणि खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालतं. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. काही जण ते करणार आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
गळ्याची आण घेऊन सांगतो
पुढे म्हणाले, रोहितला जिल्हा परिषदेची तिकीट आम्ही दिली. गळ्याची आण घेऊन सांगतो, साहेब सांगत होते, अजिबाद देऊ नको. मी साहेबांचं ऐकलं नाही. मी तिकीट दिलं. त्यानंतर म्हणाला हडपसरला उभं राहायचं. आम्ही म्हणालो तू कर्जत जामखेडला उभं रहा. आम्ही तिथं मदत करु. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतर उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सुटेल. ही सर्व कामे झाली पाहिजेत. तुम्ही देशाचे विकास पुरुष आहात, तसं आम्हीही आमच्या जिल्ह्यात विकास करण्याचा प्रयत्न करतोय, असं मी मोदीजींना सांगितलं. आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे, राज्याचा आम्ही देणारच आहोत. आता आम्हाला पाणी पाहिजे, पाण्याचे महत्व वाढलेले आहे. पाणी पुण्याला दिलं तर आम्हाला इंदापूरला वापरता येईल. मुळशीचं धरण वाढवायचं आहे. त्यामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे, असं पंतप्रधान मोदी यांना म्हटलं, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.