बारामती : सर्वत्र लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार त्यानंतर श्रीनिवास पवार आणि आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यावर आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीनिवास काकांची भूमिका योग्य आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका त्यांना महागात पडेल असे रोहित पवार म्हणाले आहेत. तर, स्वतःच्या भुमिकेमुळे ‘दादां’चे कुटुंब एकटे पडले आहे, असही रोहित पवार म्हणाले.
काय म्हणाले रोहित पवार
श्रीनिवास काकांचा व्हीडिओ मी बघितला आहे. लोकांना वाटते तीच भूमिका त्यांनी घेतली आहे. दादांना श्रीनिवास काकांनी जवळून पाहिलं आहे आणि साहेबांनाही बघितलं आहे. श्रीनिवास पवार यांची भूमिका पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसांना पटणारी भूमिका आहे. पवार साहेब हे पवार कुटुंबीयांची ओळख आहे. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांची संस्कृती बोलून दाखवली आहे.
अजित पवार यांनी भूमिका घेतल्यावर कुटुंब म्हणून आम्हाला वाईट वाटलं होतं. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. पण दादांसह त्यांच्या जवळच्या पवारांनी म्हणजेच काकींनी आणि त्यांच्या दोन मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, पवार कुटुंबात 100 पेक्षा जास्त पवार आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,अजित पवारांना एकटे पाडण्यात आले नसून, त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांचे कुटुंब एकटे पडले आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली ती साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका आहे. स्वाभिमानी नागरिकाला विचारल्यास तोही तेच बोलेल. दादांनी घेतलेली भूमिका महागात पडेल, असेही रोहित पवार म्हणाले.