बारामती : महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज बारामतीत भव्य सभेच आयोजन करण्यात आलं होत. या सभेत भाषण करताना आमदार रोहित पवार हे भावूक होत ढसाढसा रडले. रोहित पवार यांनी यावेळी शरद पवार यांना एक विनंती देखील केली. म्हणाले, अहो, जेव्हा पक्ष फुटला तेव्हा मी आणि काही कार्यकर्ते तसेच पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसून चर्चा करत होतो. पवार साहेब टीव्हीकडे पाहत होते. त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. टीव्ही बघत-बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिलं.
पण, बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही अजिबात काळजी करु नका. आपला जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, तो आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपण नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची. जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी घेण्याच्या लेव्हलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे शब्द शरद पवारांनी दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. यावेळीच रोहित पवारांना भर सभेत अश्रूंचा बांध फुटला.
साहेब, मी तुम्हाला विनंती करतो
पुढे रोहित पवार रडत-रडत म्हणाले, साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं, ते कृपा करुन पुन्हा करु नका. तुम्ही आमचे जीव आहात. तुम्ही आमचे आत्मा आहात. तसेच लोकं तुम्हाला त्रास देतात, ते मोठे नेते जरी असले तरी सामान्य माणसं, आमच्यासारखे छोटेमोठे कार्यकर्ते आणि आख्ख पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे. साहेब आम्ही स्वार्थासाठी लढत नाहीत.
कदाचित मलाही मंत्रीपदाची शपथ मिळू शकली असती. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी जी कंपनी उभी केली, कुठलिही चूक नसताना त्या कंपनीवर कारवाई केली. मला माहिती होतं की, मी सत्तेत गेलो असतो तर ती कारवाई झाली नसती, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
पवार साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्याबरोबर नाहीत. आम्ही सर्व विचारांसाठी तुमच्यासोबत आहोत. तुम्ही केलेले ६० वर्षातले कष्ट आम्ही कधीच विसरणार नाहीत. कुणी आम्हाला काहीही दिलं तरी आम्ही स्वार्थ मध्ये न आणता, तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही सर्वजण तुमच्या शब्दावर लढायला तयार आहोत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.