गणेश सुळ
केडगाव(पुणे) : राज्यातील खाजगी व सहकारी दुध संघांनी दुधाच्या दरात तब्बल तीन वेळा कपात केली आहे. याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील दुध व्यावसायिकांकडून रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती दुध व्यावसायिकांकडून दिली आहे. महाराष्ट्र शासनाने दुध दर कपात केल्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.
दूध दर कपात होत आहे, मात्र चाऱ्याचे दर गगणाला भिडत आहे. त्यामुळे दूध दर वाढ हा एकमेव पर्याय असून त्यासाठी हा रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत दौंड तहसीलदार आणि यवत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने दुध दर कपात केले असून दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याचा आरोप दुग्ध व्यवसायिकांकडून करण्याय येत आहे. या वर्षभरात प्रति लिटर ११ रुपयेप्रमाणे दुधाचे दर कमी झाले आहेत. मात्र पशुखाद्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. दुग्ध व्यवसायाच्या इतर सर्व बाबीमध्येही खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे दुग्धव्यवसाय कर्जाच्या खायित गेला आहे. कर्ज असणाऱ्या व्यवसायिकांचे कर्जाचे व्याज व हप्ते थकले आहेत. नाबार्ड ने अनुदान योजना देखील बंद केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. कोरोना जागतिक महामारी, लाळीचा प्रादुर्भाव आणि त्यावर आत्ता दुधाचे दर पडणे यामुळे दुध व्यावसायिक अगदी मेटाकुटीला आला आहे.
त्यामुळे वरील सदर विषयांचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे आणि यासाठी पारगांव परिसरातील सर्व दुग्ध व्यावसायिक सोमवार दि.२७ रोजी शिरुर-सातारा रोडवर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले असून शासनाने यात लक्ष देऊन आमच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे.