बारामती : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासंबंधी मागण्या लावून धरण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूर शहरात जुन्या पुणे-सोलापूर मार्गावर बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरवात केली आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले असून सरकार मात्र आरक्षणावर निर्णय देत नाही. यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी पुणे- सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. यावेळी एक मराठा लाख मराठा, तुमच आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंदापूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.