पुणे: भीमाशंकर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर परतीच्या प्रवासात संकट ओढावले. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मार्गावर कार आणि 2 रिक्षांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले असून, त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

श्रावण महिन्यामुळे भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर काही भाविक दर्शनासाठी गेले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंचरच्या दिशेने भीमाशंकरकडे जाणाऱ्या एका कारची समोरून येणाऱ्या 2 रिक्षांना धडक बसली. या रिक्षांमधून भाविक दर्शन घेऊन परतत होते.

धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही रिक्षांमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहून तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना वाहनांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात सर्व जखमींवर उपचार सुरू असून, 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताच्या कारणाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारमधील काही प्रवाशांनी मद्यसेवन केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.







