बापू मुळीक
सासवड : पुरंदरचे तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत असल्याने जुन्या तहसिलदार कार्यालयातील अनेक टपरीधारक हे विस्थापित झाले असून, त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात संरक्षण भिंतीला लागून सर्व टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी, पुरंदर तालुक्याचे तहसिलदार विक्रम राजपूत यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी निवेदनाद्वारे केली, यावेळी अँड सचिन जाधव, राहुल गायकवाड, राणीताई जाधव, हे उपस्थित होते,
पुरंदरचे तहसिलदार मा. विक्रम राजपूत यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जून्या तहसील कार्यालयासमोर गेले अनेक वर्षे, टपरीधारक धारक, महसूल प्रशासनाशी निगडीत असलेली, प्रतिज्ञापत्र, विविध प्रकारचे दाखले, विविध प्रकारचे दस्त ,करार झेरॉक्स, टायपिंग आदी कामे करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु पुरंदरचे तहसील कार्यालय हे नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत असल्याने, मुळ तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले सर्व टपरीधारक आज विस्थापित झाले असून, त्यांच्या समोर त्यांच्या कुटूंबाच्या उपजीवीकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘
सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व विविध मान्यंवर व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. यावेळी बोलताना नामदार अजितदादा पवार यांनी. काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारतीत असलेल्या प्रशासकीय कार्यालयाशी निगडित असलेल्या झेरॉक्स टायपिंग आदी कामकाजासाठी प्रशासनाने गाळे द्यावेत याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
त्यानुसार मुळ तहसील कार्यालयातील विस्थापित सर्व टपरीधारकांना बी. ओ. टी. तत्वावर एकसारखे गाळे बांधून ते भाडे तत्वावर दिल्यास किंवा बांधा वापरा व भाडे द्या. या तत्वावर विस्थापित टपरीधारकांना गाळे प्रशासनाने दिल्यास विस्थापित टपरीधारकांच्या कुटूंबाचा उपजीवीकेचा प्रश्न कायमचा मिटून शासनाला देखील भाडे मिळेल व इमारतीच्या देखभाल दुरुस्ती व इतर खर्च त्यातून प्रशासनाला करता येईल.
त्यामुळे प्रशासनाने, प्रशासकीय इमारतीच्या दक्षिण व पश्चिम बाजूस इमारतीच्या आवारात संरक्षण भिंतीला लागून, गाळे बांधल्यास टपरीधारकांना न्याय मिळेल व त्यांच्या कुटूंबाच्या उपजीवीकेचा प्रश्न कायमचा सूटेल. मोजक्याच टपरीधारकांना गाळे दिल्यास इतर सर्व टपरीधारकांवर अन्याय होईल.
त्यामुळे एकही टपरीधारक विस्थापित होणार नाही याचा शासनाने व प्रशासनाने सहानुभूती पूर्वक विचार करून सर्व टपरीधारकांना दुजा भाव न करता गाळे द्यावेत असेही तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे न झाल्यास विस्थापित टपरीधारकांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या उपजीवीकेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने, टपरीधारकांच्या समवेत बेमुदत उपोषण करण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर विस्थापित झालेल्या अनेक टपरीधारकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.