बापू मुळीक
सासवड : सासवड-हडपसर मार्गावर वाघिरे महाविद्यालय येथील बस थांब्यावर सायंकाळी चार नंतर पीएमटीच्या बस थांबत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच सव्वाचार साडेचार वाजता सुटणारे महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी साडेपाच वाजले तरी बस थांब्यावरच असतात. पार्श्वभूमीवर पुरंदर बस प्रवासी संघाचे अध्यक्ष तानाजी सातव यांनी त्याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी बस थांबत नसल्याची माहिती सातव यांना दिली. त्याच दरम्यान पीएमपीएलची एक बस बसथांब्यावर न थांबता पुढे जाऊन थांबली व त्यातून एक प्रवासी उतरला व बस पुढे निघून गेली.
ही बाब लक्षात येताच तानाजी सातव यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन सदर बाब पीएमपी चे मुख्य वाहतूक सरव्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. पुढील बस ही थांब्यावरून पुढे जात असल्याचे पाहून तानाजी सातव यांनी बस पुढे उभे राहून बस थांबवण्यास भाग पाडले. व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना बस मध्ये बसवून दिले. वाघिरे महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, शिवाजी इंग्लिश मीडियम शाळा यामधील विद्यार्थ्यांना वाघिरे महाविद्यालयाच्या थांब्यावरून नियमित प्रवास करावा लागतो.
पवारवाडी, दिवे, ढूमेवाडी, जाधववाडी, काळेवाडी व झेंडेवाडी या दहा किलोमीटर अंतरातील प्रवासासाठी विद्यार्थ्यांना जवळपास एक ते दीड तास बसची वाट पाहत थांब्यावर थांबावे लागते. यात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. विद्यार्थिनी वेळेत घरी येत नसल्याने पालकांना त्याबाबत चिंता वाटते. बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने पर्यायी मार्गाने प्रवास करून घर गाठावे लागत असल्याची बाब तानाजी सातव यांनी सविस्तरपणे दत्तात्रय झेंडे यांच्या कानावर घातली.
झेंडे यांनी तातडीने सदर चालकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या थांब्यावर बस नियमित थांबत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती देताना तानाजी सातव यांनी सांगितले की बस थांबत नसल्याची माहिती पीएमपीच्या तक्रार विभागातही दिली होती. तसेच सासवड मुख्य स्थानकातील वाहतूक नियंत्रकांनाही याबाबत माहिती दिली होती. याबाबत योग्य ती कडक कारवाई करण्यात आल्याचे झेंडे यांनी व्यक्तिशः तानाजी सातव यांना फोन करून सांगितले तसेच पीएमपीकडूनही तक्रारीची दखल घेण्यात आली.
त्यानंतर सर्वच ठिकाणी बस थांब्यावर विद्यार्थी विद्यार्थिनी असल्यास जाता येता बस थांबवून विद्यार्थी चढ-उतार शिस्तीत करावी. विद्यार्थी वेळेत शाळा महाविद्यालय येथे पोहोचावे व शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेत घरी पोहोचावे यासाठी सर्वच आगारातील चालक वाहकांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही व्यवस्था कायम राहावी यासाठी वाघिरे महाविद्यालय, सासवड एस.टी बस स्थानक व नगरपालिका समोरील थांबा येथे नियमित लक्ष ठेवून विद्यार्थी जास्त वेळ थांब्यावर थांबू नयेत, यासाठी लक्ष देणार असल्याचे तानाजी सातव यांनी सांगितले.