देऊळगाव राजे : राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा सन २०२३-२०२४चा पन्नास हजार रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रास जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमांतर्गत सप्टेंबरमध्ये राज्यस्तरीय मूल्यांकन पथकाने भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. यामध्ये रुग्णालयात रुग्णांना अतितात्काळ सेवा, सर्व प्रकारच्या सोई- सुविधा, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, संसर्ग नियंत्रण, आरोग्य सुधारणा प्रचार व तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, रुग्णालय परिसरात चार व दोन चाकी वाहनतळ, तसेच पर्यावरण पूरक वातावरण आदी बाबींची पथकाने पाहणी केली होती.
कायाकल्प पुरस्कार हा राज्य सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दरवर्षी दिला जातो. या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन आणि रूग्णसेवेची गुणवत्ता या निकषांवर आधारित मूल्यमापन केले जाते. देऊळगाव राजे आरोग्य केंद्राने या सर्व निकषांवर उच्च मानांकन मिळवून तेरावा क्रमांक मिळवत आपल्या आरोग्यसेवा प्रणालीची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अविनाश आल्लमवार यांनी सांगितले, “कायाकल्प पुरस्कार मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. यामागे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उज्जवला जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व टीमचे अथक प्रयत्न केले आहेत. स्वच्छता आणि उत्तम आरोग्यसेवा देण्याचे आमचे ध्येय आम्ही पुढेही जोपासू.”
वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश आल्लमवार व डॉ. दिनेश खानसोळे मुख्यालयी निवासी राहून सेवा देतात यामुळे देऊळगाव राजे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. तसेच आरोग्य केंद्राच्या या यशामुळे परिसरातील इतर आरोग्य केंद्रांनाही प्रेरणा मिळेल, आणि स्वच्छता व दर्जेदार सेवा या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित होईल.
कायाकल्प पुरस्कार मिळाल्यामुळे देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे, आणि या पुरस्काराने त्यांच्या कार्यक्षमतेला नवा आयाम दिला आहे.